पुणे : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच आहे. दोन दिवसांत कर्वे रस्ता, महम्मद वाडी आणि विश्रांतवाडी भागात घरफोडीच्या तीन घटना घडल्या आहेत.
कर्वे रस्त्यावर घरफोडी
कर्वे रस्त्यावरील दाणे बंगला कुलूप लावून बंद होता. अज्ञात चोरट्याने लोखंडी गज वाकवून घरात प्रवेश केला. चोरट्याने बेडरूममधील कपाटातील १३ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरले. ही घटना ७ जुलै रात्री ७.१५ ते ८ जुलै सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान घडली. ८४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक सावंत पुढील तपास करीत आहेत.
महम्मद वाडी येथील घरफोडी
महम्मद वाडी येथील आशीर्वाद पार्क येथे ७ जुलै सकाळी ९.३० ते रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान दुसरी घरफोडीची घटना घडली. ४६ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरूमच्या कपाटातील ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे दागिने चोरले.
विश्रांतवाडी येथील वाईन शॉप लुट
विश्रांतवाडी मध्ये चोरट्यांनी वाईन शॉप लुटले. ही घटना ८ जुलै रात्री १० ते ९ जुलै सकाळी ९.१५ वाजण्याच्या दरम्यान घडली. ५६ वर्षीय नागरिकाने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. अनुराग कॉम्प्लेक्समधील वाईन शॉपचे लोखंडी शटर तोडून चोरट्यांनी ६४ हजार रुपयांची रोख रक्कम, बॉटल सिल्व्हर कॉईन आणि इतर साहित्य, एकूण २ लाख ७९ हजार ८४५ रुपयांचा ऐवज चोरला. सहाय्यक पोलीस निरीक्षक शेख पुढील तपास करीत आहेत.